जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारले आहे. 3 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ईव्हीएम हॅकिंग करून दाखवावं लागणार आहे.
देशात पार पडलेल्या विविध निवडणुकांनंतर ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप खोडून काढत राजकीय पक्षांना हॅकिंगचे आव्हान दिले होते.
आठ राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाने पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर आपले उत्तर पाठवले. यातील फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने हे आव्हान स्वीकारले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वंदना चव्हाण, गौरव जयप्रकाश जाचक आणि यासिन हुसैन शेख हे प्रतिनिधी ईव्हीएम हॅकिंगमध्ये सहभागी होणार आहेत. हॅकिंगसाठी ईव्हीएम मशीन निवडण्याचा अधिकारही राष्ट्रवादीने निवडणूक आयोगावर सोपावला आहे.
3 जून रोजी होणाऱ्या हॅकिंगसाठी निवडणूक आयोगाने पंजाब, यूपी आणि उत्तराखंडमधून ईव्हीएम मशीन मागितल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.