नाशिक: राज्यात अल्पवयीन वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच नाशिकमधून पुन्हा एक ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागून भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दुचाकीवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर केलेल्या प्राथमिक तपासात कार चालवणारा मुलगा हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तो एका सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहितीही समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, वाहन मालक आणि पालकांचीही जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या घटनेची माहिती नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली असून, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि पालकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.