जात पंचायतीची दहशत; पिडितेच्या कुटुंबावर टाकला बहिष्कार

जात पंचायतीची दहशत; पिडितेच्या कुटुंबावर टाकला बहिष्कार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

प्रगत महाराष्ट्रात एकीकडे महिला सक्षमिकरण करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नाशिकमध्ये जात पंचायतीसारख्या बुरसटलेल्या मनोवृत्त्तींनी पुन्हा डोकं वर काढलंय. एका अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी गावातल्या जातपंचायतीन या कुटुंबावर दबाव टाकत त्यांना आपली तक्रार मागे घेण्यास भाग पाडले आहे. आणि कुटुंब ऐकत नाही म्हटल्यावर जात पंचायतीन या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केलंय. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेशवर तालुक्यातील राजेवाडीत राज्याला हादरून टाकणारी घटना घडलीय. राजेवाडीत राहणारं हे कुटुंब सध्या दहशतीखाली वावरत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका मुलाने बलात्कार केला. प्रकरण ज्यावेळी गावातल्या जात पंचायतीसमोर पोहोचलं तेव्हा जातीचा अपमान व्हायला नको म्हणून मुलीच्या आई बापाला प्रकरण दाबून टाकण्यास सांगण्यात आलं. आधी दमदाटी मग थेट मुलामुलींचं लग्न लावून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. शिवाय गावातच पाच एकर जागा देण्याचं अमिषही दाखवण्यात आलं. आपल्या मुलीचं किमान त्या मुलासोबत लग्न तरी होईल या विचारानं आई बापानं लग्नाला संमती दिली. पंच कमिटीनं हा निर्णय आई बापाच्या अंगठ्यानं कागदावर लिहून घेतला. मात्र नंतर जे घडलं त्याने या म्हाताऱ्या आईबापाच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपी मुलानं लग्नास तर नकार दिलाच मात्र जात पंचायतीनं देखील लिखापडी केलेला कागद फाडून टाकण्यासाठी धमकी दिली. पीडित कुटुंबाने लिखापडी केलेली कागजपत्र फाडले नाहीत म्हणून त्यांना समाजतून वाळीत टाकण्यात आलयं. यावेळी संतापलेल्या आई-वडीलांनी पोलिसात जाणार म्हटल्यावर या परिवाराला जातीबाहेर ठेवण्याचा फतवा काढण्यात आला.नातेवाईकांच्या लग्नापासून एखाद्याच्या दुःखाच्या प्रसंगात देखील जाण्यास या परिवाराला बंदी घालण्यात आलीय.

जात पंचायतीने बहिष्कार टाकल्यानंतर पीडित मुलीच्या आई वडीलांनी मुलीसोबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केलीय. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आणि जातपंचायत विरोधी कायद्याच्या संबंधातील गुन्हा ही आता दाखल करण्यात आलाय. जात पंचायतीच्या क्रूर प्रथे विरोधात राज्य सरकारनं कायदा केला असला तरी या घटनांची यादी दिवसेंदिवस वाढतेय. या घटनेत तर थेट अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कारच दाबून टाकण्याचं धाडस जात पंचायतीनं केल्यानं आता या पंचांविरोधात काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version