नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी आदेश जारी करत आठ तालुक्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांतील सर्व शाळा आज बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ शाळाच नव्हे, तर या भागांमध्ये आज भरणारे आठवडी बाजार, जत्रा, मेळावे तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमही पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.