राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ‘ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे’, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
‘ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे’,अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.