नाशिक: राजकारणात अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये सिद्ध केली आहे. तिकीट वाटपाचा गोंधळ, अंतर्गत बंडाळी आणि आमदारांची उघड नाराजी अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाजन यांनी नाशिक महापालिकेत 72 जागांचा ‘जादुई आकडा’ गाठून भाजपच्या सत्तेचा मार्ग सुकर केला. नाशिकच्या या विजयाने गिरीश महाजन हे केवळ संकटमोचकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्राचे खरे 'किंगमेकर' असल्याचे अधोरेखित झाले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत महाजन यांनी घेतलेले धाडसी निर्णय अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरले होते. निष्ठावंतांना बाजूला सारून अन्य पक्षांतून आलेल्या 'आयारामांना' संधी दिल्याने पक्षात मोठे वादंग निर्माण झाले होते. अगदी उमेदवारी अर्जांच्या वाटपावेळी (एबी फॉर्म) झालेल्या राड्यापासून ते तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यापर्यंत अनेक आव्हाने समोर होती. त्यातच स्थानिक आमदारांनी घेतलेली विरोधी भूमिका अडचणीची ठरत होती. मात्र, आपल्या खास शैलीतील व्यूहरचनेने त्यांनी हे चित्र पालटून दाखवले.
या महाविजयाचे शिल्पकार ठरले ते महाजन यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष निलेश बोरा. ज्या वेळी पक्षांतर्गत विरोधकांनी बोरांना लक्ष्य केले होते, त्याच वेळी त्यांनी महाजनांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता एखाद्या 'बाहुबली' प्रमाणे जबाबदारी पेलली. बोरा यांनी बूथ पातळीवरील सूक्ष्म नियोजन आणि प्रचाराची सूत्रे अशा प्रकारे हलवली की, विरोधातील लाट ओसरून भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. अंतर्गत संघर्षाला अंगावर घेत त्यांनी विजयाचा 72 आकडा गाठण्यात मोलाची भूमिका बजावली.
उत्तर महाराष्ट्रावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला 'टास्क' पूर्ण करण्यासाठी महाजन यांनी जळगाव, धुळे आणि नाशिक अशा तिन्ही महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकवला. प्रतिकूल राजकीय हवामान असूनही त्यांनी आखलेली रणनीती विरोधकांचे मनसुबे उधळून लावणारी ठरली. "आम्हाला किमान 85 जागांची अपेक्षा होती, पण 72 जागांसह मिळालेले हे यश नाशिककरांनी आमच्या कामावर टाकलेला विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया यावेळी महाजन यांनी व्यक्त केली.
या विजयानंतर नाशिक महापालिकेच्या इतिहासात भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा पराक्रम केला आहे. "आम्ही नाशिककरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असा पुनरुच्चार महाजन यांनी विजयानंतर केला. राजकारणाच्या पटलावर आपली 'वज्रमूठ' कायम राखत महाजन यांनी आगामी काळातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. आता नाशिकच्या विकासाचे हे गाडे पुढच्या पाच वर्षांत कशी गती घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.