नाशिक: राज्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या वावरण्याच्या आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचा मुक्त वावर वाढला असून अनेक निष्पाप नागरिक आणि लहान मुलांचे जीवही अशा हल्ल्यांमध्ये गेले आहेत.
अशातच नाशिकमधील सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे बिबट्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्या दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या हा रहिवासी भागातील भिंतीवरून उडी मारताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दीही जमल्याचे दिसून आले.
वनविभागाची तातडीने मोहीम
बिबट्याच्या हालचाली लक्षात घेत वनविभाग आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. बिबट्याला शोधण्यासाठी परिसरातील झाडे-झुडपे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचारी अतिशय दक्षतेने परिस्थिती हाताळत आहेत.
रहिवासी भागात भीतीचे वातावरण
ध्रुवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत. अशा भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरी भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.