नाशिक: उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिकमधील द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा विळखा आता लवकरच सुटणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या सारडा सर्कल ते द्वारका आणि वडाळा नाका ते ट्रॅक्टर हाऊस या 'ग्रेड सेपरेटर' (अंडरपास) निर्मितीला जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सुमारे 214 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिककरांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.
शहराचा चेहरामोहरा बदलणार या महाप्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. अंडरपासच्या कामादरम्यान शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी आयुक्तांनी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिस ठाण्यांना संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणात गर्दीची वेळ, चौकातील वाहनांची संख्या आणि पर्यायी मार्गांची चाचपणी केली जात आहे. विशेषतः अवजड वाहने, चारचाकी आणि दुचाकींसाठी स्वतंत्र मार्गांचे नियोजन करून नाशिककरांची गैरसोय टाळण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रकल्पाच्या नियोजनानुसार, सारडा सर्कल ते काठेगल्ली या मार्गावर 800 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येईल, तर वडाळा नाका सिग्नल ते ट्रॅक्टर हाऊसपर्यंत 300 मीटरचा अंडरपास असेल. हे दोन्ही अंडरपास दुतर्फा वाहतुकीसाठी खुले राहतील. यामुळे नाशिकरोड, आडगाव, पुणे आणि धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना थेट आणि विनाअडथळा मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, सध्या द्वारका परिसरात असलेले जुने भुयारी मार्ग या प्रक्रियेत हटवले जाणार असून अधिक आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या काळात शहरात 21 नवीन रस्ते, पाच पुलांची उभारणी आणि नऊ प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामाचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले असून, सिंहस्थापूर्वी सारडा सर्कल ते काठेगल्ली हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सिंहस्थानंतर हाती घेतले जाण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या सर्वेक्षणात द्वारका, सारडा सर्कल, वडाळा नाका आणि काठेगल्ली परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर पर्यायी मार्ग म्हणून कसा करता येईल, यावर अभ्यास सुरू आहे. इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्याजवळील दुरुस्तीची कामे विचारात घेऊनच उर्वरित मार्गांत बदल केले जातील. दरम्यान, मंत्रालयाकडून निधीला मंजुरी मिळाल्याने कंत्राटाची प्रक्रियाही वेगात सुरू असून, जानेवारी अखेरपर्यंत सर्व तांत्रिक नियोजन पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.