एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्याचे सुत्र सुरूच आहे. नादेंडमध्ये आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.
नांदेडमधील एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. गंगाधार येवतीकर असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगारात गंगाधार येवतीकर चालक म्हणून कार्यरत होते. एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या संपात गंगाधार येवतीकर सहभागी होते. मात्र, मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे आर्थिक अडचणीत सापडेल्या येवतीकर यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एसटी महामंडळ राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फी तसेच निलंबनाची कारवाई राज्य सरकारने केली आहे. विलिनीकरण होण्यास राज्य सरकारने नकार कळवला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे. तसेच जोवर विलिनीकरण होत नाही, तोवर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.