नांदेड: नांदेड शहरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली असून, अचानक जमीन खचल्यामुळे एक कार अक्षरशः जमिनीत गाडली गेली. ही घटना शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संबंधित परिसरातील जमिनीचा आधार कमकुवत झाला होता. याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरून जात असताना अचानक जमीन खचली आणि त्यामध्ये कार अडकून पूर्णपणे खाली गेली.
ही कार प्राध्यापक चंद्रशेखर येंगडे चालवत होते. वाहन अचानक खाली जात असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालत्या वाहनातून बाहेर उडी मारली. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. कार मात्र काही क्षणांतच जमिनीत अडकली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने आवश्यक यंत्रसामग्रीच्या मदतीने कार सुरक्षितपणे बाहेर काढली. या घटनेदरम्यान काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात बुधवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. तामसा-अर्धापूर मार्गावरील चेनापूरसमोरील आमराई परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे वारकवाडी येथील पांडुरंग बाबुराव खूपसे (वय ४०) आणि वानवाडी येथील ग्रामपंचायत सेवक यशवंत चंपती डवरे (वय 38) हे आपल्या कामानिमित्त प्रवास करत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान, अवघ्या काही तासांच्या अंतरात नांदेड जिल्ह्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ठिकाणी मुसळधार पावसामुळे अचानक जमीन खचून कार जमिनीत गाडली गेली, तर दुसरीकडे भरधाव वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रस्त्यांची सुरक्षितता, पावसामुळे निर्माण होणारे धोके आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.