एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांनी आमच्या संपर्कात २० आमदार असल्याचा दावा केला आहे. सहा दिवसांनंतर पहिल्यांदाच शिंदे यांनी थेट माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तुमच्या संपर्कात आमदार आहेत तर त्यांची नावे सांगा. ती यादी जाहीर करा. म्हणजे स्पष्टता येईल, असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. बाहेर काही लोक सांगत आहेत. आमच्या संपर्कात एवढे आमदार आहेत. तेवढे आमदार आहेत. तर त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावी. त्यानंतर सर्व स्पष्टता येईल. खोटी माहिती देऊन समोरचे लोक दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
आमदारांना पळवून नेले, त्यांना बंदिवान केले. त्यांना मारहाण केल्याचा आरोपही शिवसेनेतून केला जात होता. हा आरोपही त्यांनी खोडून काढला. या ठिकाणी ५० आमदार एकत्र आले आहेत. ते खूश आहेत. आनंदात आहेत. हे सर्व लोक स्वत:च्या मर्जीने येथे आले आहेत. स्वार्थासाठी आले नाहीत. कुणाच्याही दबावाखाली आले नाहीत. मी आजही शिवसेनेत आहे. यात कुठलीही शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमचे शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील, असेही ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.