जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा
धावात्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरु नये अशा घोषणा लोकल तसेच रेल्वे स्थानकांवर नेहमी होत असतात. मात्र, अनेक प्रवाशी याकडे दुर्लक्ष करुन धावत्या ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्याचे धाडस करुन आपला जीव धोक्यात घालतात. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानकातील असाच एक थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या घटनेतील महिला प्रवासी मृत्यूच्या दाढेतून बचावली आहे.
बोरीवली येथे राहणाऱ्या लता महेश्वरी या रेल्वे अपघातून सुखरुप बचावल्या आहेत. शुक्रवारी रात्री काही कामानिमित्त त्या नालासोपारा येथे आल्या होत्या. रात्री घरी जाताना त्या नालासोपारा येथून 9.15 ची विरार चर्चगेट लोकल पकडत असताना हा अपघात घडला.
धावती लोकल ट्रेन पकडत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या लोकल ट्रेन बरोबर फरफटत गेल्या. हा सर्व प्रकार तिथे उभ्या असलेल्या RPF अधिकाऱ्याच्या निदर्शनास आला. क्षणाचाही विलंब न करता या अधिकाऱ्याने धावत जाऊन त्या महिलेला ओढून बाहेर काढले आणि या महिलेचे प्राण वाचवले. हा अधिकारी देवदूतासारखा महिलेच्या मदतीला धावून आला.
आरपीएफ सब इन्स्पेक्टर गोपाल कृष्ण राय असे या महिलेचे प्राण वाचणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.
कोणीही कितीही घाई असली तरी धावती ट्रेन पकडू नये, असे करणे तुमच्या जीवावर बेतू शकते असे आवाहन राय यांनी केले आहे. लता महेश्वरी यांनी देखील राय यांचे आभार मानले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.