नागपूर, १८ डिसेंबर : नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी महामेट्रो आणि आशियाई विकास बँकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे आशियाई विकास बँकेकडून (एडीबी) १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि एडीबीच्या संचालक मिओ ओका यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नागपूर मेट्रोच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (ईआयबी) कडून एकूण ३५८६ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यापैकी १५२७ कोटी रुपये एडीबीकडून तर उर्वरित रक्कम ईआयबीकडून मिळणार आहे. हा निधी जपानी येन या चलनात उपलब्ध होणार असून कमी व्याजदरामुळे महामेट्रोसाठी फायदेशीर ठरणार आहे.
प्रकल्पाची रचना कशी आहे :
नागपूर मेट्रो टप्पा-२ चा एकूण विस्तार ४३.८ किलोमीटरचा असेल.
यामध्ये खालील मार्गांचा समावेश आहे:
खापरी ते एमआयडीसी इएसआर: १८.५ किलोमीटर
ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी: १३ किलोमीटर
प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर: ५.६ किलोमीटर
लोकमान्य नगर ते हिंगणा: ६.७ किलोमीटर
या प्रकल्पामुळे नागपूर शहर आणि परिसरातील सुमारे १० लाख रहिवाशांना सुविधा मिळणार आहेत.
कार्यक्रमाला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, प्रधान सचिव आश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, संचालक हरेंद्र पांडे तसेच एडीबीचे विविध विषयतज्ज्ञ उपस्थित होते. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन शहराचा सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.