Heavy Vehicle Ban: दादर आणि माटुंगा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन वाहनांना वाट मोकळी करून देण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. दादर येथील ऐतिहासिक टिळक पुलावर अवजड वाहनांना आजपासून पुढील 3 महिने प्रवेश बंदी असणार आहे. हा बदल 12 फेब्रुवारी ते 12 मे 2026 या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे.
नियमावली आणि वेळेचे बंधन:
पुढील तीन महिने सकाळी 7.00 ते रात्री 11.00 या वेळेत खालील वाहनांना टिळक पुलावरून प्रवास करता येणार नाही:
सर्व प्रकारच्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस
सिमेंट मिक्सर आणि डंपर
मोठे ट्रेलर आणि इतर अवजड वाहने
बंदीमागील प्रमुख कारण
सध्या मुंबईत एलफिन्स्टन उड्डाणपूल आणि सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकडून येणारा वाहतुकीचा भार धारावी आणि टिळक पुलावर पडत आहे. या अतिरिक्त भारामुळे दादर परिसरात होणारी कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
जड वाहनांसाठी 'हे' आहेत पर्यायी मार्ग:
1. पूर्व उपनगरे आणि नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी:
मुलुंड, मानखुर्दकडून येणारी जड वाहने सायन हॉस्पिटल जंक्शनवरून उजवीकडे वळतील. त्यानंतर सुलोचना शेट्टी मार्ग, कुंभारवाडा जंक्शन, कटारिया मार्ग, शोभा हॉटेल, सावरकर रोड, चैत्यभूमी आणि सिद्धिविनायक मंदिर मार्गे पुढे जातील.
2. दक्षिण मुंबई (परेल-लालबाग) कडे जाण्यासाठी:
दादर टी.टी. ब्रॉडवे जंक्शनवरून हिंदमाता ब्रिज, परेल वर्कशॉप, लालबाग ब्रिज खालून, भारतमाता सिग्नल ते गरम खाडा सिग्नलवरून उजवीकडे वळून चिंचपोकळी ब्रिजमार्गे मार्गस्थ होता येईल.
3. उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून उत्तरेकडे जाणारी वाहने टिळक पुलाऐवजी दादर टी.टी. सर्कल ते माहेश्वरी सर्कल, अरोरा जंक्शन, सायन हॉस्पिटल आणि कुंभारवाडा जंक्शन मार्गे जातील.
4. सेना भवन ते सायन प्रवासासाठी:
सेना भवन, एल. जे. रोड, शोभा हॉटेल, कटारिया रोड ते कुंभारवाडा जंक्शन आणि सुलोचना शेट्टी मार्ग वापरून सायनच्या दिशेने जाता येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.