मुंबई : गेल्या काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत आहे. तर दुपारपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा – कॉलेजला सुट्टी दिली असली तरी सरकारी आणि खासगी कार्यालये मात्र चालू आहेत. त्यामुळे सकाळी पावसातून, साचलेल्या पाण्यातून, उशीराने धावणाऱ्या लोकलमधून प्रवास करत कसेबसे मुंबईकर आपापल्या कार्यालयात पोहोचले. मात्र आता पुन्हा घराच्या दिशेने जाणारी त्यांची वाट बिकट झाली आहे. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले असून त्यामुळे रस्ते वाहतुक धिम्या गतीने सुरू आहे. परिणामी, परतीच्या वाटेवर असणाऱ्यांना प्रचंड वाहतुककोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्गांवर बोरिवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्यागतीने सुरू असून चालकांना तासन् तास वाहतुक कोंडीत थांबावं लागत आहे. तर चेंबूर टिळकनगरमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून टिळकनगरमधील रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे अंधेरी सबवे, मिलन सबवे, मालाड सबवे हे पाण्याखाली गेले असून येथील वाहतुकीवर त्यांचा परिणाम दिसून येत आहे. तसेच पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकही 15 ते 20 मिनिटाने उशीराने धावत आहेत. जून महिन्यात दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर पाहायला मिळत असून मुंबईत जुलै महिन्यातील सरासरी पावसापैकी 60 टक्के पाऊस केवळ पहिल्या 3 दिवसांतच झाला असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Heavy rainfall causes waterlogging. Visuals from Matunga Senapati Bapat Road pic.twitter.com/witVLuw1EA — ANI (@ANI) July 4, 2026
सरासरी पर्जन्यमान (4 जुलै, सकाळी 8 ते दुपारी 4)
शहर : 47 मिमी
पूर्व उपनगरे : 125 मिमी
पश्चिम उपनगरे : 111 मिमी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.