Mumbai Water Shortage: मुंबईतील मुसळधार पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ; तरीही पाणीटंचाईचे सावट कायम

गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा तब्बल 43.46 टक्क्यांवर होता, त्यामुळे यंदाची स्थिती तुलनेने चिंताजनक मानली जात आहे. एकूण पाणीसाठा सुमारे 1.17 लाख दशलक्ष लिटर इतका नोंदवण्यात आला आहे.
Mumbai Water Shortage: मुंबईतील मुसळधार पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ; तरीही पाणीटंचाईचे सावट कायम

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ असूनही एकूण पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. सध्या मुंबईच्या सात तलावांतील एकूण पाणीसाठा 8.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा तब्बल 43.46 टक्क्यांवर होता, त्यामुळे यंदाची स्थिती तुलनेने चिंताजनक मानली जात आहे. एकूण पाणीसाठा सुमारे 1.17 लाख दशलक्ष लिटर इतका नोंदवण्यात आला आहे.

तलावनिहाय आकडेवारीनुसार, विहार तलावात सर्वाधिक 57.18 टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल तुळशी तलावात 33.96 टक्के, मोडकसागरमध्ये 22.35 टक्के, मध्य वैतरणामध्ये 12.38 टक्के, तर भातसा तलावात 5.72 टक्के साठा आहे. तानसा तलावात केवळ 3.60 टक्के पाणीसाठा असून, अप्पर वैतरणा तलावात पाणीपातळी एलडीएल (लोअर डेड लेव्हल) खाली गेल्याने उपयुक्त साठा शून्य मानला जात आहे.

गेल्या 24 तासांत तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. तुळशी तलावात 207 मिमी, विहारमध्ये 195 मिमी, मध्य वैतरणामध्ये 70 मिमी, मोडकसागरमध्ये 67 मिमी, भातसा 52 मिमी, तानसा 51 मिमी आणि अप्पर वैतरणामध्ये 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच भांडुप संकुलात 219 मिमी पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.

पावसामुळे तलावांतील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरीही एकूण परिस्थिती अद्याप समाधानकारक नाही. पुढील काही दिवसांत आणखी पाऊस झाल्यास साठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे टळलेले नाही, असे स्पष्ट दिसते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version