मुंबईत गेल्या काही दिवसांत हवामानाने अक्षरशः पलटी मारली आहे. मुंबईकरांचा नोव्हेंबर महिना म्हणजे सर्वसाधारण थंडीचा महिना, पण यंदा थंडीने असा झंझावात घातला आहे की मुंबईकरांनाही स्वतःच्या शहरावर विश्वास बसत नाही. आज सकाळी सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवलेले तापमान 16.2 अंश सेल्सिअस गेल्या 11 वर्षांतील सर्वात कमी नीचांक! सकाळच्या थंडगार हवेने नागरिकांना वाटलं, “हे मुंबई आहे की कोणत्या हिल स्टेशनची सकाळ?”
मुंबईने इतकी कडाक्याची थंडी याआधी 2016 मध्ये अनुभवली होती. पण यंदा तापमानाने एकदम 5 अंशांनी घसरण केली आणि हवेतच गारठा पसरला. काही परिसरात तर परिस्थिती आणखीच विचित्र दिसली. बदलापूरचा पारा तर 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला ज्यामुळे बदलापूरचे वातावरण अक्षरशः महाबळेश्वर प्रमाणे वाटू लागले! थंडीमुळे पहाटेपासून शहरावर एक हलकासा धुरकट पडदा दिसू लागला आहे. थंड हवेत प्रदूषण वाढल्याने AQI थेट 170 पर्यंत पोहोचला.
एकीकडे थंडीचा आनंद तर दुसरीकडे वाढत्या प्रदूषणाची काळजी हा विचित्र मिश्र अनुभव आज मुंबईकरांना आला. महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या या थंडीमागे कारणंही तितकीच महत्वाची आहेत. उत्तर भारतातून येणारे थंड, कोरडे वारे मोठ्या वेगाने दक्षिणेकडे सरकत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी पडत असल्याने ही थंड लाट थेट महाराष्ट्रात येऊन धडकत आहे. हवामान तज्ज्ञ सांगतात की बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांच्या हलचालींमुळे हवेतलं बाष्प कमी झालं आहे. बाष्प कमी म्हणजे थंडी अधिक! त्यातच मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाल्याने वातावरण आणखी स्वच्छ आणि कोरडे झालं आहे, आणि हेच थंडीला जोर चढण्याचे कारण ठरत आहे.
आज सकाळी कुलाबा परिसरात तापमान 21.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर बदलापूरमध्ये पारा तब्बल 11 अंश सेल्सिअसपर्यंत कोसळला आणि इथली सकाळ डोंगरदऱ्यांमधील थंड वाऱ्यांची आठवण करून देणारी ठरली. पुण्यातही सकाळची थंडी चांगलीच जाणवली आणि तापमान 9.4 अंशांवर पोहोचले. मात्र सर्वात गारठलेले ठिकाण ठरले ते पुण्याजवळील लोणी काळभोर इथे तापमान अवघे 6.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले आणि हे राज्यातील दिवसातील सर्वात कमी तापमान ठरले.
काही आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ तर आणखी आश्चर्यचकित करणारा दावा करत आहेत. यंदा ला-नीना प्रक्रिया अधिक सक्रिय राहण्याची चिन्हे आहेत. ला-नीना सक्रिय झाले की तापमान झपाट्याने खाली येतं आणि थंडी नेहमीपेक्षा दुप्पट जाणवते! यंदा मुंबईकर, पुणेकर, नाशिककर आणि संपूर्ण महाराष्ट्राने आपली शाल, स्वेटर्स, ब्लँकेट्स… सगळं आधीच बाहेर काढून ठेवा. कारण थंडीची लाट आली आहे आणि यंदाचा हिवाळा जरा ‘बिंधास्त’ येणार असं स्पष्ट दिसत आहे!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.