मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे केवळ रेल्वेची गाडी नाही, तर या महानगराच्या अहोरात्र धडधडणाऱ्या नसा आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत यामध्ये प्रवाशांच्या गर्दीचा दाब इतका वाढला आहे की, ‘श्वास कोंडणे’ ही आता प्रवाशांची सवय बनली आहे. याच गर्दीच्या कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
‘जुगाड’ करून डबे जोडण्यापेक्षा, आता थेट चेन्नईच्या ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (ICF) मधून पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आणि सलग 15 डब्यांची पहिली-वहिली लोकल मुंबईच्या दिशेने झेपावली आहे. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईहून रवाना झालेली ही रेल्वे म्हणजे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
यासंदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी दिली आहे. आतापर्यंत 15 डब्यांच्या लोकलसाठी जुन्या 12 डब्यांच्या गाडीला तीन अतिरिक्त डबे जोडले जात असत. या ‘जोडून’ केलेल्या रचनेमुळे डब्यांची संख्या वाढली तरी तांत्रिक मर्यादेमुळे जागेची कमतरता भासत होती. मात्र, ही नवी कोरी 15 डब्यांची ‘EMU’ रेक पूर्णपणे सलग असून, ती विशेषतः मुंबईच्या वाढत्या गर्दीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. या एका ट्रेनमध्ये एकाच वेळी 7,555 प्रवासी अत्यंत सुलभपणे प्रवास करू शकणार आहेत. ‘मेक इन इंडिया’चा हा एक उत्कृष्ट नमुना असून, यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा आणि क्षमता दोन्हीमध्ये विक्रमी वाढ होणार आहे.
ICF manufactures 15-car EMU!
The Integral Coach Factory (ICF) rolled out its 15-car EMU rake yesterday (18.02.2026), marking a major step towards enhancing suburban capacity and commuter convenience. pic.twitter.com/WOKAVnI38E — Integral Coach Factory Chennai (@icfindrlys) February 19, 2026
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ही पहिली लोकल दाखल झाल्यानंतर, लवकरच अशा प्रकारच्या 12 नवीन ‘नॉन-एसी’ लोकल मुंबईत टप्प्याटप्प्याने येणार आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस दुसरी लोकल येण्याची शक्यता असून, यामुळे विरार-डहाणू सारख्या लांब पल्ल्याच्या आणि गर्दीच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवरील CSMT-कल्याण आणि कर्जत-कसारा या मार्गांवरही या 15 डब्यांच्या गाड्या धावतील.
केवळ डबे वाढवून चालणार नाही, तर तंत्रज्ञानातही सुधारणा हवी, या प्रवाशांच्या मागणीची दखल रेल्वेने घेतली आहे. लवकरच मुंबईच्या रुळांवर स्वयंचलित दरवाजे असलेल्या ‘नॉन-एसी’ लोकलही धावणार आहेत. यामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या अपघातांना लगाम बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला 15 डब्यांच्या लोकलसाठी काही स्थानकांची लांबी अपुरी पडत आहे. म्हणूनच विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच, मुंबईकरांच्या सेवेत या ‘महारथ’ लोकल पूर्ण ताकदीने धावू लागतील.
मुंबईच्या धावपळीच्या जीवनात प्रवाशांचा वेळ आणि सुरक्षितता या दोनच गोष्टींना सर्वोच्च महत्त्व असते. वाढत्या नागरीकरणाचा भार पेलण्यासाठी सध्याच्या यंत्रणेचे बळकटीकरण करणे काळाची गरज होती. या 15 डब्यांच्या लोकलमुळे केवळ प्रवासी क्षमता वाढणार नाही, तर गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आणि वक्तशीरपणा सुधारण्यासही मदत होईल. रेल्वे प्रशासनाचा हा ‘हाय-टेक’ अवतार मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासातील ‘गर्दीची झुंबड’ कमी करून, प्रवासाचा आनंद वाढवणारा ठरेल, यात शंका नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.