Mumbai Monsoon: अखेर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू! मुंबईत मान्सून दाखल, IMD चा ऑरेंज अलर्ट; कुठे पडणार मुसळधार पाऊस?

मुंबईत अखेर नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाले असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Monsoon: अखेर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू! मुंबईत मान्सून दाखल, IMD चा ऑरेंज अलर्ट; कुठे पडणार मुसळधार पाऊस?

मुंबईकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतपणे मुंबई आणि उत्तर कोकण परिसरात नैऋत्य मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, तर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची जाणीव करून दिली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा होती. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत उष्णतेचा चांगलाच तडाखा जाणवत होता. अनेक भागांतील तापमान वाढले होते, तर पाणीसाठ्यांवरही त्याचा परिणाम दिसून येत होता. मात्र, आता मान्सून सक्रिय झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: Weather Update: रखडलेली पेरणी पुन्हा सुरु होणार! राज्यात मान्सूनला सुरुवात; पुढील चार दिवस अलर्ट जारी

हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील 24 ते 48 तासांत शहरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी मुंबई आणि कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, मुरुड, रायगड परिसरातही चांगल्या पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागातही पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण, दमदार पश्चिमेकडील वारे आणि किनारपट्टीवरील द्रोणीय स्थितीमुळे मान्सूनला गती मिळाली आहे.

यंदा मान्सूनने केरळ किनारपट्टीवर उशिरा प्रवेश केला होता. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर जवळपास दोन आठवडे मान्सूनची प्रगती ठप्प होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली होती. आता मात्र वातावरणातील बदलामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

हेही वाचा: Mumbai Local Update : मोठी बातमी! मुंबईत पाऊस सुरू होताच पश्चिम रेल्वे विस्कळीत; किती मिनिट उशिराने धावतायत ट्रेन?

दरम्यान, पुढील काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मान्सूनचा विस्तार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अखेर मान्सूनचे आगमन झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी पुढील दोन दिवस शहरासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version