मुंबई आणि मिरा-भाईंदरच्या रस्त्यांवर दररोज होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी आणि प्रवासात खर्ची पडणारा अमूल्य वेळ हा नोकरदारांच्या समोरील मोठा प्रश्न होता. पण, आजपासून या प्रवासाचे चित्र कायमचे बदलणार आहे. मिरा-भाईंदरकरांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणारी आणि त्यांच्या प्रवासाला नवी गती देणारी दहिसर ते काशीगाव (Dahisar To Kashigaon Metro) ही बहुप्रतीक्षित 'मेट्रो 9' आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे आज दिमाखदार उद्घाटन होणार असून, यामुळे मिरा-भाईंदरचा मुंबईशी असलेला संपर्क अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
'मेट्रो 9' हा प्रकल्प केवळ एक प्रवास मार्ग नसून ती मुंबईच्या उपनगरांना जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. पूर्णपणे उन्नत (Elevated) स्वरूपातील या मार्गावर दहिसर, पांडुरंग वाडी, मिरा गाव आणि काशीगाव अशी चार महत्त्वाची आणि अत्याधुनिक स्थानके असणार आहेत.
विशेष म्हणजे, ही मार्गिका गुंदवली (अंधेरी पूर्व) ते दहिसर अशा 'मेट्रो 7' ला थेट जोडली गेल्यामुळे प्रवाशांना आता एकाच सलग प्रवासात अंधेरी ते काशीगाव असा अखंड प्रवास करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ने ही 'इंटिग्रेटेड कॉरिडॉर' प्रणाली यशस्वीपणे राबवल्यामुळे प्रवाशांना मेट्रो बदलण्याचा मनस्ताप आता सहन करावा लागणार नाही.
पूर्वी दहिसर ते काशीगाव या अंतरासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकून किमान 30 ते 45 मिनिटे खर्ची पडावी लागत होती. आता हाच प्रवास अत्याधुनिक वातानुकूलित डब्यांमधून अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होईल. स्मार्ट कार्ड आणि क्यूआर कोड (QR Code) तिकीट सुविधेमुळे प्रवाशांचा तिकीट खिडक्यांवरील ताटकळत उभे राहण्याचा वेळही वाचणार आहे. वेळेच्या या प्रचंड बचतीसोबतच, रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाल्याने प्रदूषणातही मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि वेगवान प्रवासाचा हा एक उत्तम संगम ठरणार आहे.
प्रवाशांच्या सोयीचा सूक्ष्म विचार करून या मार्गाचे वेळापत्रक आणि फेऱ्यांचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. गुंदवली ते काशीगाव या 19.79 किलोमीटर लांबीच्या एकत्रित मार्गावर पहिली गाडी पहाटे पाच वाजून 50 मिनिटांनी तर शेवटची गाडी रात्री अकरा वाजता धावणार आहे. नोकरदारांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी तर इतर वेळेत आठ ते 10 मिनिटांच्या अंतराने मेट्रो उपलब्ध असेल. संपूर्ण आठवड्याचे नियोजन पाहता, सोमवार ते शुक्रवार या कामाच्या दिवसांत 276 फेऱ्या, शनिवारी 223 आणि रविवारी 205 फेऱ्या चालवल्या जातील, ज्यामुळे लाखो प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी वेळेवर पोहोचणे शक्य होईल.
एकंदरीतच, मुंबईसारख्या गतीमान शहरात 'मेट्रो 9' हा प्रकल्प मिरा-भाईंदर परिसरासाठी खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' सिद्ध होणार आहे. या जलद कनेक्टिव्हिटीमुळे केवळ प्रवाशांचा दिलासा वाढणार नाही, तर या परिसरातील व्यावसायिक, शैक्षणिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही अभूतपूर्व चालना मिळेल. रोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या शेकडो चाकरमान्यांच्या आयुष्यातील अडथळे आता कायमचे दूर झाले असून, विकासाच्या एका नव्या पर्वाची ही नांदी ठरली आहे. 'मेट्रो 2ए' आणि विस्तारित 'मेट्रो 7 व 9' चे हे जाळे आता मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य आणि आश्वासक भाग बनले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.