Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षाखेरीस दोन मेट्रो मार्गिका होणार सुरू, कोणता मार्ग असणार?

या सेवेमुळे मुंबईतील मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि प्रवासाचा वेग लक्षणीय वाढणार आहे.
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!  वर्षाखेरीस दोन मेट्रो मार्गिका होणार सुरू, कोणता मार्ग असणार?

मुंबई: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे, मात्र त्यामागे राजकीय आचारसंहितेचा अडसर उभा राहिला आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पूर्णपणे तयार असलेल्या मेट्रो मार्गिकांचे औपचारिक उद्घाटन सध्या करता येणार नाही. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि तयार पायाभूत सुविधा वापरात आणण्यासाठी दोन मेट्रो मार्गिका विनाउद्घाटन थेट प्रवासी सेवेत सुरू करण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मंडाळा-चेंबूर मेट्रो 2B आणि दहिसर-काशीगाव मेट्रो 9 या दोन मार्गिकांचा समावेश आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) उभारलेली मेट्रो 2B ची पहिली टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून ही मार्गिका पूर्णतः  तयार आहे. त्याचबरोबर दहिसर ते भाईंदर जोडणारी मेट्रो 9 सध्या चाचणी आणि अंतिम तांत्रिक तपासणीच्या प्रक्रियेत आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास डिसेंबरअखेरीस या दोन्ही मार्गिका औपचारिक उद्घाटनाविना प्रवासी सेवेत दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रो 9 ही दहिसर पूर्व ते सुभाषचंद्र बोस स्टेडियम, भाईंदर अशी उन्नत मार्गिका आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव ही चार स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित चार स्थानकांचा समावेश अंतिम टप्प्यात करण्यात येईल. या दोन्ही मार्गिकांमुळे मुंबईतील मेट्रो जाळ्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: माणिकराव कोकाटे ही हिट विकेट, स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी अजित पवार… संजय राऊतांचा थेट आरोप

मेट्रो 2B ही सुमारे 23.6 किलोमीटर लांबीची आणि 20 स्थानकांची मार्गिका असून ती मंडाळा ते ईएसआयसी नगर दरम्यान धावणार आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळा, मानखुर्द, बीएसएनएल (गोवंडी), शिवाजी चौक (चेंबूर) आणि डायमंड गार्डन (चेंबूर) ही पाच स्थानके प्रवासी सेवेसाठी खुली होणार आहेत. पुढील टप्प्यांत ही मार्गिका कुर्ला आणि बीकेसी मार्गे अंधेरी पश्चिम पर्यंत विस्तारणार आहे. 

मेट्रो 2B ही अंधेरीतील डी. एन. नगर येथे मेट्रो 1 ला जोडली जाणार असून, कुर्ला पूर्व ते मानखुर्द दरम्यान प्रवाशांना थेट दळणवळण मिळणार आहे. तसेच चेंबूर मोनोरेलला थेट मेट्रो जोडणी मिळणार आहे. याशिवाय मेट्रो 1, मेट्रो 2A, मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-आरे), मेट्रो 4, मेट्रो 7, तसेच भविष्यातील एअरपोर्ट रेल लिंक आणि मानखुर्द येथील मेट्रो 8A यांनाही चेंबूर परिसरातून जोडणी मिळणार आहे.

उद्घाटन झालं नसलं तरी सेवा सुरू होणं हे मुंबईकरांसाठी मोठं दिलासादायक पाऊल ठरणार आहे. मेट्रो 2B आणि मेट्रो 9 कार्यान्वित झाल्यास पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान, सोपा आणि सुरक्षित होणार असून, रस्ते वाहतुकीवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी होईल.

हेही वाचा: Jasprit Bumrah Viral Video : एका छोट्याशा कारणावरून बुमराह चाहत्यावर संतापला आणि फोन फेकला; एअरपोर्टवरील Viral Video

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version