मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लोकलमधील भांडणे, मारामाऱ्या आणि प्रवाशांमधील वादाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आता एका महिलेला पुरुष प्रवाशाने लोकल ट्रेनमध्ये मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात घडला. संबंधित महिला डब्यातील एका सीटवर झोपली होती. याच कारणावरून एका पुरुष प्रवाशाशी तिचा वाद झाला. काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की संबंधित व्यक्तीने महिलेवर हात उगारत मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर शिवीगाळ करत कमरेचा पट्टा काढून महिलेला धमकावल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डब्यात अनेक प्रवासी उपस्थित असूनही कोणीही त्या महिलेला मदत करण्यासाठी पुढे आले नाही. काही जण संपूर्ण प्रकार पाहत बसले, तर काहींनी त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किंवा मारहाण करणाऱ्या व्यक्तीला रोखण्यासाठी कोणीही ठोस प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सार्वजनिक वाहतुकीत अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याची मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.