मुंबई: जर तुम्ही या रविवारी लोकलने प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर विविध तांत्रिक कामांसाठी आज शनिवार रात्रीपासून मोठा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ब्रिटीशकालीन पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने तब्बल 13 तासांचा ब्लॉक जाहीर केला असून, याचा मोठा फटका लोकल वाहतुकीला बसणार आहे.
ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान असलेला ‘पूल क्रमांक 5’ आता शंभर वर्षांहून अधिक जुना झाला आहे. त्याचे आयुर्मान संपल्याने रेल्वे जुने गर्डर हटवून नवीन गर्डर बसवणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 11 वाजता सुरू होऊन रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहील. याच काळात प्रभादेवी येथील उड्डाणपुलाच्या पाडकामासाठीही 7.5 तासांचा स्वतंत्र ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दुहेरी कामामुळे पश्चिम रेल्वेच्या 145 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून 76 फेऱ्या अंशतः रद्द राहतील.
ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, लोअर परळ, माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी 14 अप जलद लोकल दादरपर्यंतच चालवल्या जातील, तर 62 धीम्या लोकल वांद्रे स्थानकावरूनच परतीच्या प्रवासाला निघतील. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दादर किंवा वांद्रे येथे गाडी बदलावी लागणार आहे.
केवळ पश्चिम रेल्वेच नाही, तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही रविवारी मनस्ताप सहन करावा लागू शकतो. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. या काळात लोकल 20 मिनिटे विलंबाने धावतील. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प राहील.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्स हार्बरवर ब्लॉक असला तरी हार्बर मुख्य मार्गावर (CSMT ते पनवेल/वाशी) कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक नियमित सुरू राहील. मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील बदलांमुळे हार्बर मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे की, अत्यंत निकडीचे काम असल्यासच घराबाहेर पडावे. प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे, जेणेकरून स्थानकांवरील गर्दीत अडकणे टाळता येईल. सुरक्षित प्रवासासाठी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.