मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडली आहे. बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादातून तिघांनी एका प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
ही घटना मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये मध्यरात्री घडली. प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये सीटवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला केवळ शाब्दिक बाचाबाची होत असली तरी काही वेळातच परिस्थिती चिघळली. डब्यातील इतर प्रवाशांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
रात्री सुमारे 12.10 वाजता लोकल ठाकुर्ली स्थानकात पोहोचताच वाद घालणाऱ्या तिघांनी अचानक धारदार कोयता बाहेर काढला आणि एका प्रवाशावर वार करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच डब्यात एकच गोंधळ उडाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर आरोपी लगेचच ट्रेनमधून उतरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानकातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.