जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईला पावसानं झोडपल्यानं मुंबईकरांचे हाल झाले आहेत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक खोळंबली
असून घरात असलेल्यांना घराबाहेर आणि घराबाहेर असणाऱ्यांना घरी परतणं कठीण झालं आहे.
मुसळधार पावसाच्या तडाख्याने मुंबई आणि उपनगरात ठिक-ठिकाणी पाणी साचलं आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ
भागात पाणी साचलं आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर, खार, कसारा भागात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्ते, रेल्वे
वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी न थांबता सतत धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे.
मुंबईत बुधवारीही शाळांना सुट्टी असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. लोकांना वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही
केली आहे. मुंबई पोलिसांना ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस तत्काळ मदतीला येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
आहे.
येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.