Mumbai Coastal Melody Road 'Jai ho' Song : मुंबई कोस्टल रोडवर गेल्या महिन्यात अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आलेल्या 'मेलडी रोड'ला आता स्थानिक रहिवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. ऑस्करविजेत्या 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' या गाण्याची धून ऐकवणारा हा रस्ता ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींमुळे वादात सापडला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे 'मेलडी रोड'चे हंगेरियन तंत्रज्ञान?
कोस्टल रोडवर मरीन ड्राईव्ह बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर अमरसन्स गार्डन ते ब्रीच कँडी दरम्यानच्या 700 मीटर अंतरावर हा प्रयोग करण्यात आला आहे. हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावर विशेष 'संगीतमय रिब्स' (पट्ट्या) बसवण्यात आल्या आहेत. जेव्हा एखादे वाहन 70 ते 80 किमी/तास वेगाने या पट्ट्यांवरून जाते, तेव्हा चाकांच्या घर्षणातून 'जय हो' गाण्याचे स्वर निर्माण होतात. 11 फेब्रुनारी 2026 रोजी उद्घाटन झालेला हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच रस्ता ठरला होता.
650 हून अधिक कुटुंबांचा तीव्र आक्षेप
म्युझिकल रोडचे कौतुक होत असतानाच, ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांसाठी ही धून डोकेदुखी ठरली आहे. या भागातील सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. गाड्यांच्या सततच्या आवाजा मुळे घरातील शांतता भंग पावत असून, खिडक्या उघड्या ठेवणेही कठीण झाले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगाचा स्थानिक नागरिकांना कोणताही फायदा नसून केवळ मानसिक त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तांत्रिक मूल्यांकन आणि 'नॉईज डेसिबल स्टडी'
रहिवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत BMC ने आता या रस्त्याचे तांत्रिक मूल्यांकन करण्याचे निर्देश कन्सल्टंटला दिले आहेत. यामध्ये 'नॉईज डेसिबल स्टडी' (Noise Decibel Study) करण्यात येणार आहे. साऊंड लेव्हल मीटरच्या साहाय्याने या भागातील आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये (dB) मोजली जाईल. हा आवाज निवासी क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या मानकांपेक्षा जास्त आहे का, हे तपासले जाणार आहे. या अभ्यासाच्या अहवालानंतरच या म्युझिकल रोडमध्ये सुधारणा करायची की तो कायमचा बंद करायचा, याचा निर्णय घेतला जाईल.
भविष्यातील उपाययोजना आणि रहिवाशांची मागणी
ब्रिच कँडी परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने, नागरी संस्था आता यावर गांभीर्याने विचार करत आहे. जर ध्वनी पातळी मर्यादेबाहेर आढळली, तर संगीतमय पट्ट्या काढून टाकणे किंवा आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी तांत्रिक बदल करणे असे पर्याय महापालिकेकडे असतील. सध्या तरी या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाला स्थानिक नागरिकांच्या शांततेचा 'फटका' बसला आहे.
हेही वाचा – Mumbai AC Local: गर्मी सहन होइना! त्रस्त मुंबईकरांचा एसी लोकलने फुकटात प्रवास, आकडा पोहोचला तब्बल…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.