मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, या रिमझिम सरींनंतरही मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि कमी न होणारं तापमान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी मुंबईत अद्याप मान्सूनपूर्व सरींचं आगमन झालेलं नाही.
शुक्रवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होतं. काही उपनगरांमध्ये हलक्या सरी पडल्या, तर शनिवारी सकाळीही अनेक भागांत रिमझिम पाऊस अनुभवायला मिळाला. सकाळी वातावरण आल्हाददायक वाटत असलं तरी काही वेळातच उष्णता आणि चिकट हवेमुळे पुन्हा अस्वस्थता जाणवू लागली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या समुद्राकडून पश्चिमेकडील दमट वारे वाहत असल्याने हवेत आर्द्रतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सकाळच्या वेळी आर्द्रता 80 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवली जात असून दिवसभर ती 70 टक्क्यांच्या आसपास कायम राहत आहे. त्यामुळे तापमान फार वाढलेलं नसतानाही उकाडा असह्य वाटत आहे.
शुक्रवारी कुलाबा येथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे 34.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. रात्रीचं तापमानही 28 ते 29 अंशांच्या आसपास राहिल्याने नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, कमाल आणि किमान तापमानातील फरक कमी असल्यामुळेच उकाडा अधिक जाणवत आहे.
दरम्यान, दक्षिण कोकण भागात ढगांची द्रोणीय स्थिती तयार झाल्याने काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
खोपोली, कर्जत आणि खालापूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगवान वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र या पावसामुळे काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला. संध्याकाळच्या वेळी काळे ढग दाटून आल्याने परिसरात अंधार पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
मुंबईत मात्र अजूनही मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत मुख्यतः कोरडंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता असली तरी तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे आगामी काही दिवस मुंबईकरांना उष्णता आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा आता आणखी वाढली असून नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देणाऱ्या सरींची प्रतीक्षा कायम आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.