Schools Prefer ST buses over Private Luxury Buses for School Trips: राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलींसाठी पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या विश्वासाला कौल दिला आहे. खाजगी ट्रॅव्हल्सचे वाढते दर आणि सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षण संस्थांनी ‘लाल परी’ला पसंती दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एसटी महामंडळाने शालेय सहलींच्या माध्यमातून तब्बल 127 कोटी 18 लाख रुपयांचे ऐतिहासिक उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत या उत्पन्नात 33 कोटी 29 लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली असून महामंडळाने आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.
25 हजारांहून अधिक बस फेऱ्यांचा ‘विक्रम’
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यभरातून शाळांच्या मागणीनुसार एकूण 25,558 बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून लाखो विद्यार्थ्यांनी सुरक्षितपणे गड-किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी हेच पर्यटनाचे मुख्य साधन ठरले असून, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही, हे या आकडेवारीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
एसटीला पसंती मिळण्याची प्रमुख कारणे
शाळांनी खासगी बसेसऐवजी एसटीची निवड करण्यामागे काही ठोस तांत्रिक आणि आर्थिक कारणे आहेत:
50 टक्के सवलत: शासनाकडून शालेय सहलींच्या बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते, ज्यामुळे हा प्रवास अत्यंत स्वस्त पडतो.
नव्या दमाच्या गाड्या: महामंडळाने यंदाच्या ताफ्यात ‘शिवाई’, ‘ई-बसेस’ आणि अन्य अद्ययावत गाड्यांचा समावेश केला आहे.
सुरक्षितता आणि विश्वास: एसटीचे अनुभवी चालक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम गाड्यांमुळे पालकांचा आणि शिक्षकांचा विश्वास वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित सेवा पुरवली. यातून महामंडळाने तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न गत वर्षीच्या तुलनेत ३३… pic.twitter.com/w9j9l3Od3H — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 7, 2026
प्रताप सरनाईक यांचे शाळांना आवाहन
‘शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि हळवा कोपरा असतो,’ असे प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केले. अद्ययावत बसेसमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि समाधानकारक झाला आहे. आगामी शैक्षणिक वर्षातही शाळा आणि महाविद्यालयांनी खासगी बसेसच्या जाळ्यात न अडकता, सुरक्षित प्रवासासाठी एसटीचाच अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे. भविष्यातही शाळांच्या मागणीनुसार तत्परतेने बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.