मागील दहा दिवसांपासून मान्सूनची प्रगती थांबलेली दिसत आहे. अरबी समुद्रातच त्याची स्थिती अडकून राहिली असून, राज्यात पावसाची कोणतीही लक्षणीय हालचाल झालेली नाही. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 18 जून उजाडूनही मान्सून राज्यात दाखल होण्याबाबत प्रगती दिसत नाही.
आधी 15 जूनपर्यंत मान्सून येईल असा अंदाज होता, नंतर तो 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र सध्याच्या परिस्थितीवरून 20 जूनलाही मान्सून येण्याची शक्यता कमी वाटत आहे. मुंबईसह राज्यात पाऊस येण्यासाठी आणखी आठ दिवस किंवा त्याहून अधिक विलंब होऊ शकतो. जर हीच स्थिती कायम राहिली, तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मान्सूनच्या सध्याच्या परिस्थितीवरून पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याची पातळीही कमी होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे, ज्यामुळे मोठ्या अडचणींचा धोका निर्माण झाला आहे.
1 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याचाच अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, अजून साधा मॉन्सून राज्यात दाखल झाला नाही. चिंता वाढत आहे. पुढील काही दिवस स्थिती अशीच राहिली तर गंभीर संकट निर्माण होऊ शकते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.