Viral Video: कोर्टाबाहेर अजब प्रकार! माकडाने पाडला तब्बल 2 लाखांचा पाऊस; पुढे जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर न्यायालय परिसरात घडलेल्या एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Viral Video: कोर्टाबाहेर अजब प्रकार! माकडाने पाडला तब्बल 2 लाखांचा पाऊस; पुढे जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालयात शनिवारी एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. कोर्ट परिसरात अचानक झाडावरून नोटा उडताना दिसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला नेमकं काय घडतंय हे कुणालाच समजत नव्हतं. मात्र काही वेळानंतर समोर आलेल्या माहितीनंतर सर्वजण अवाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वकील रवींद्र कुमार हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह न्यायालयात आले होते. काही अधिकृत कामासाठी मुद्रांक खरेदी करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांच्याकडे मोठी रोख रक्कम असलेली बॅग होती. या बॅगेत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. कोर्ट परिसरात फिरत असताना अचानक एका माकडाने झडप घालत ती बॅग हिसकावली आणि जवळच्या झाडावर चढून बसले.

हेही वाचा: Raigad ST Driver Viral Video: मुंबई-गोवा महामार्गावर थरार; कार आडवी लावून ST चालकाला भररस्त्यात बेदम मारहाण

घटना इतक्या वेगाने घडली की उपस्थित लोक आणि वकील काही क्षण स्तब्ध झाले. बॅग परत मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले. काहीजण माकडाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही लोक बघ्यांची भूमिका घेत संपूर्ण प्रकार पाहत होते. मात्र त्यानंतर जे घडलं, त्याने परिसरात अक्षरशः खळबळ उडाली.

झाडावर बसलेल्या माकडाने बॅग उघडली आणि आतल्या नोटा एकामागोमाग एक खाली फेकण्यास सुरुवात केली. काही वेळातच झाडावरून नोटा उडू लागल्या. कोर्ट परिसरात अचानक नोटांचा वर्षाव होत असल्याचं चित्र पाहून अनेकजण धावत त्या नोटा गोळा करू लागले. काहींनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

या संपूर्ण गोंधळात अनेकांनी प्रामाणिकपणे पैसे गोळा करून परत देण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारानंतर बहुतांश रक्कम परत मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पैसे मोजल्यानंतर सुमारे आठ हजार रुपये कमी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे गर्दीतून कुणीतरी नोटा घेऊन निघून गेल्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा: Rohini Paradhye Death Case: ‘चिमणे, परत ये गं…’ रोहिणीच्या पतीची भावनिक पोस्ट; मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र, नेटकऱ्यांना नेमकं काय खटकलं?

घटनेनंतर वकील आणि त्यांचे सहकारी शांतपणे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र या विचित्र प्रसंगाची चर्चा दिवसभर न्यायालय परिसरात रंगलेली होती. “माकडाने कोर्टात नोटांचा पाऊस पाडला” ही घटना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठी रोख रक्कम घेऊन फिरताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version