मथुरा येथे सोमवारी रात्री भीषण रस्ता अपघात घडला. यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे सात बस आणि तीन कार यांचा समावेश होता. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही वाहनांना आग लागली.
या दुर्घटनेत चार जणांचा जळून मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास यमुना एक्सप्रेसवेवरील बळदेव पोलीस ठाण्याच्या हद्दी जवळ झाला. दाट धुक्यामुळे दृश्यता अत्यंत कमी होती, त्यामुळे मागोमाग येणाऱ्या वाहनांनी नियंत्रण गमावून एकमेकांवर धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर काही क्षणांतच बस आणि कारना आग लागली. आगीमुळे अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धडकेचा आवाज बंदुकीच्या गोळीसारखा होता आणि त्यानंतर जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. या दुर्घटनेत 25 हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सुमारे 20 रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळपास 150 जणांना विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. मात्र, नेमक्या जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, एनएचएआय आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्याचे आणि जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर देखरेख करत आहेत.
सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे. दाट धुके आणि कमी दृश्यता हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.