सध्या लग्न म्हटले की लाखो रुपयांचा चुराडा होत असतो. त्यात डीजेवर मदधुंद अवस्थे मध्ये नाचणारी मित्रमंडळी, मुहूर्त टळून गेला तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात उन्हात ताटकळत बसलेले वन्हऱ्हाडी, असे चित्र पाहायला मिळते. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला.लग्न सोहळ्यावर प्रत्येकजण लाखोंचा खर्च करतो. प्री-वेडिंगपासून सुरू झालेला हा खर्च लग्न पार पडेपर्यंत दहा-पंधरा लाखांच्याही पुढे जातो. परंतु हातवळण येथील शिवाजी अश्रु शिंदे यांनी आपला मुलगा किरण याचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने आयोजित केला होता.
समाजप्रबोधनात्मक उपक्रम म्हणून वरातीत नाचण्या ऐवजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न हे तीनही सोहळे एकाच दिवशी पार पडल्याने अनावश्यक खर्च टळला. दुपारी नवरदेवाची वरात डीजेऐवजी टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात वारकरी वेशातच नातेवाईक, मित्रमंडळी या दिंडीत सहभागी झाले. नवरदेवानेही हातात टाळ घेत या दिंडीत सहभाग घेतला. दरम्यान, दुसरीकडे लग्नमंडपात सुनील महाराज झांबरे यांचे कीर्तन सुरू होते.
आलेले वन्हऱ्हाडी कीर्तनात तल्लीन झाले होते. कीर्तनानंतर सीता स्वयंवराचा अभंग आणि शेवटी मंगलाष्टक होऊन हा विवाह पार पडला. लग्न समारंभातील वरातीऐवजी कीर्तन या शिंदे परिवाराच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.