गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणाने मराठी आणि परप्रांतीयांमध्ये वाद झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशातच ठाण्यातून एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने दारुच्या नशेत मनसे नेते राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे. हा प्रकार ठाणे शहरातील पोखरण रोड नं. २ गांधीनगर येथील अनिल वाइन्ससमोर काल रात्रीच्या सुमारास घडला होता.
शैलेंद्र संतोष यादव नाव असलेल्या परप्रांतिय रिक्षाचालकाने एका किरकोळ वादावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविषयी बोलताना “कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव सब मेरे लं… “ ”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” ”इधर कोई भी मराठी आया तो उसकी ….” अशी अभद्र आणि अपशब्द भाषा वापरुन शिविगाळ केली होती. हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असून त्याने दारु पिऊन धुडगूस घातला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये या परप्रांतीय रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात नेत मनसेनं मारहाण केल्याची माहिती स्वत: मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. त्याने कान धरून उठबश्या काढत त्याने केलेल्या कृतीबाबत तसेच वापरलेल्या अपशब्दाबाबत राज ठाकरेंची आणि अविनाश जाधव यांची माफी मागितली.
रिक्षाचालक म्हणाला की, “मी शैलेंद्र संतोष यादव, हात जोडून विनंती करतो आण सॉरी म्हणतो. काल गांधी नगर इथं मनसेच्या शाखेसमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी एका माणसासोबत माझा वाद झाला. वादातून भांडणं झालं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल बोलताना माझ्या तोंडातून अपशब्ध निघाले. त्याबद्दल मी हातजोडून माफी मागतो. या पुढे असं काही करणार नाही. मी एक रिक्षावाला आहे, रिक्षा चालवून घर कसंबसं चालवतो. मी या पुढे अशी कोणतीही चूक करणार नाही. मी दारूच्या नशेत होतो, त्यामुळे मी असं बोललो. त्यामुळे हात जोडून माफी मागतो.”
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार गाडी लावण्यावरुन रिक्षाचालक शैलेंद्र यादव आणि एका मराठी तरुणामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर ठाण्यातील गांधीनगर येथील परप्रांतियांनी रिक्षाचालकासोबत मिळून मराठी तरुणाला शिविगाळ केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अविनाश जाधव यांचा उल्लेख करत शिविगाळ देखील केली होती. त्यानंतर मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. जो कोणी राज ठाकरे यांच्याबाबतीत बोलायची हिंमत करेल, तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.