सरस्वती वैद्य हिची हत्या करणारा आरोपी मनोज साने अनेक ‘डेटिंग अॅप’वर मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे सरस्वती आणि साने यांच्यात भांडण झाले होते. या वादातूनच सरस्वती हिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. परंतु त्याने सरस्वतीची नेमकी हत्या कशी केली. याचा तपास आता पोलीस करत आहेत. मनोज साने लैंगिक वासनेच्या आहारी गेला होता. तो सतत अश्लील संकेतस्थळावर सक्रिय होता, असेही तपासात आढळले.
काय आहे प्रकरण ?
मीरा रोडमध्ये सरस्वती वैद्य (३२) या तरुणीची तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. तरुणीचा प्रियकर मनोज साने (५६) याने करवतीने मृतदेहाचे तुकडे करून तिची हत्या केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. तरुणी आणि तिचा साथीदार तीन वर्षांपासून एकत्र नयानगर फेज-७ येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहितीही समोर येत आहे. त्यांच्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता सरस्वतीची हत्या झाल्याचे समोर आले. यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात पायाचे तुकडे होते. अन्य अवयवाची आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समजते. मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.