जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत 29 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने मुंबईकरांचे चांगलेच नुकसान केले आहे. अनेक जण वाहून गेले. या पावसात मॅनहोलमध्ये पडून प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. मॅनहोल उघडे असल्याने ते नाल्यातून वाहून गेले. या मृत्यूचे कारण ठरणाऱ्या मॅनहोलना संरक्षक आवरण असावे, अशी कल्पना महापालिकेला सुचली नाही पण, केतन कदम या सामान्य मुंबईकर तरुणाने ते करून दाखवले आहे. केतन याने मॅनहोलसाठी संरक्षक लोखंडी आवरण बनवले असून उघड्या मॅनहोलमध्ये कुणी पडल्यास वाहून जाऊ नये, अशा पद्धतीने या आवरणाची रचना करण्यात आली आहे. तसेच या आवरणामुळे पाण्याच्या प्रवाहाला कुठेच बाधा येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस तसेच समुद्राला भरती असल्यास मुंबईत अनेक तास पाणी तुंबून राहते. या पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी मलनि:सारण वाहिनी व पर्जन्यजलवाहिनीचे अनेक मॅनहोल उघडण्यात येतात. मॅनहोलमध्ये कुणी पडू नये, यासाठी पालिकेकडे कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे काही मॅनहोलजवळ कर्मचारी तैनात ठेवले जातात. तर जिथे कर्मचारी नसतात, तेथे मॅनहोलला लाल कपडा बांधलेले बांबू उभे करून ठेवले जातात.
या दुर्घटनेनंतर पालिकेने मॅनहोलच्या सुरक्षेबाबत लक्ष देणे आवश्यक होते. मात्र अद्यापही याकडे लक्ष देण्यात आले नाही. मॅनहोलच्या या धोक्यावर मात करण्याची कल्पना केतन कदम या तरुणाला सुचली. केतनने स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून मॅनहोलच्या आतील बाजूस बसवण्यासाठी लोखंडी आवरण तयार केले आहे.
डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू मॅनहोलला संरक्षक आवरण नसल्याने झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर मी अशा प्रकारचे आवरण बनवले. यासाठी सात हजार रुपये खर्च आला, अशी माहिती केतन कदम याने दिली आहे. मॅनहोलवर हे आवरण बसवून त्यावर झाकण बसवावे. ज्यावेळी पाणी तुंबते त्यावेळी झाकण उघडे असले, तरी मॅनहोलमध्ये एखादा माणूस पडला तरी तो मॅनहोलमधून वाहून जाऊ शकणार नाही, असे केतन यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.