Ratnagiri: हृदय पिळवटून टाकणारी घटना! दीड वर्षांच्या मुलासह धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून जोडप्याची उडी; महिलेचा जागीच मृत्यू

रत्नागिरीतील खेडजवळ मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन जोडप्याने दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेचा मृत्यू झाला असून वडील व चिमुकला गंभीर जखमी आहेत.
Ratnagiri: हृदय पिळवटून टाकणारी घटना! दीड वर्षांच्या मुलासह धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून जोडप्याची उडी; महिलेचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह धावत्या रेल्वेतून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, पुरुष आणि लहान मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

माहितीनुसार, मडगावहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड तालुक्यातील मेटे गावाजवळून जात असताना हा प्रकार घडला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक तिघांनी रेल्वेतून उडी घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा अवघा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा:Bhiwandi: मध्यरात्री भिवंडीत भीषण अग्नितांडव! रस्त्याच्या कडेला उभी असलेली खासगी बस जळून खाक, मोठी जीवितहानी…

रुग्णालयात डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुसरीकडे, सचिन जुवळे आणि त्यांचा मुलगा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या टोकाच्या निर्णयामागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी किंवा इतर कोणते कारण होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा: Buldhana: शाळेत स्वच्छतागृहाचा अभाव ठरला जीवघेणा? नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेतील प्रवासी आणि संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही, प्रवाशांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दीड वर्षांच्या निष्पाप मुलालाही या घटनेचा फटका बसल्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास खेड पोलीस आणि रेल्वे पोलीस संयुक्तपणे करत असून, तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version