Malad Fake Baba Case : आणखी एका भोंदूबाबाचा अघोरी अवतार! महिलांना फसवणाऱ्या ‘मॉन्टी’ बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालाड पूर्व परिसरातील रिधम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ याच्याविरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Malad Fake Baba Case : आणखी एका भोंदूबाबाचा अघोरी अवतार! महिलांना फसवणाऱ्या ‘मॉन्टी’ बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील मालाड परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या एका भोंदूबाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण चर्चेत असतानाच आता मालाड पूर्वेत राहणाऱ्या रिधम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. “माझ्या अंगात देवी येते” आणि “मी लोकांच्या अंगातील भूत उतरवतो” असा दावा करत तो अनेक वर्षांपासून जादूटोण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रिधम पांचाळ हा दर रविवारी आणि गुरुवारी रात्री त्याचा दरबार भरवत असे. तो लोकांना विविध आजार बरे करण्याचे आश्वासन देत असे. तसेच ज्या महिलांना मूल होत नाही, त्यांना मूल होण्यासाठी मदत करतो, असाही दावा तो करत होता. त्याच्या या दाव्यांवर विश्वास ठेवून दूरदूरवरून अनेक लोक त्याच्याकडे येत होते. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी जय पवार यांनी दिली आहे. 

या भोंदूबाबावर उपचारांच्या नावाखाली लोकांकडून पैसे, कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू आणि सिगारेट मागितल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, तो उपचार करताना तोंडात पेटती सिगारेट ठेवून लोकांवरील भूतबाधा उतरवत असल्याचे सांगत असे. गुरुवारी आणि शनिवारी रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत मालाडमधील एका मैदानावर त्याचा दरबार भरत असे, जिथे पुरुष, महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होत्या.

हेही वाचा: Deool Band 2 First Poster: ‘देऊळ बंद 2’चं पहिलं पोस्टर रिलीज; दुचाकीवर स्वार झाले स्वामी, पोस्टरने वाढवली उत्सुकता

स्थानिकांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून रिधम पांचाळ हा आपल्या घरात आणि घरासमोर अघोरी पूजा करत होता. मात्र 4 एप्रिल 2026 रोजी त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलावून उघडपणे पूजा आणि भूत उतरवण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिसरातील 65 ते 70 स्थानिक नागरिकांनी एकत्र येत दिंडोशी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. तसेच संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. स्थानिकांनी या तक्रारीसोबत पुरावे म्हणून फोटो आणि व्हिडिओदेखील पोलिसांकडे सादर केले.

दरम्यान, दिंडोशी पोलिसांनी रिधम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ याच्याविरोधात विविध कलमांखाली एफआयआर दाखल करून त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याविरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भोंदूबाबाचे काही राजकीय संबंध असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. 

हेही वाचा: Maharashtra ST Bus: ‘लाल परी’ पुन्हा संकटात! एसटी महामंडळाला 591 कोटींचा तोटा; नाशिक, ठाण्यासह 31 पैकी 23 विभागांचे कंबरडे मोडले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version