आज पासून नागपूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा मार्गावरील उड्डाणं रद्द करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या इंधन दरांमुळे आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे विमान कंपन्यांकडून उड्डाणाला कात्री लावण्यात आली आहे. यावेळी नागपूर-मुंबई मार्गावर एअर इंडियाने 1 जून ते 31 जुलै दरम्यान सकाळच्या नियमित विमान फेऱ्या तात्पुरत्या स्थगित केल्या आहे. तर इंडिगोने हैदराबाद-नागपूर-हैदराबाद मार्गावरील विमानसेवा तसेच नागपूर-गोवा मार्गावरील दर बुधवारी होणारी फेरी रद्द केली आहे.
याशिवाय कोलकत्ता-नागपूर मार्गावरील काही उड्डाणे कमी करण्यात आली असून अहमदाबाद आणि इंदूर मार्गावरील विमान फेऱ्यांची वारंवारता ही कमी करण्यात आली आहे. परिणामी या मार्गवर पूर्वी दररोज 12 विमानांची सेवा असायची आता केवळ 8 विमानांची सेवा उपलब्ध असणारा आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि व्यावसायिक हालचालींमुळे जून-जुलैमध्ये प्रवाशांची संख्या वाढलेली असते. त्यामुळे या कपातीचा थेट परिणाम हजारो प्रवाशांवर होणार आहे.
यावेळी विमानफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने उपलब्ध आसनसंख्येवर परिणाम होणार असून त्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील 2 महिन्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. हवाई क्षेत्रात आधीच विमानांच्या उपलब्धतेचा तुटवडा असताना, या दोन प्रमुख कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशांतर्गत मार्गांवरील विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.