Mahesh Tutorials Shut down:मोठी बातमी! महेश ट्युटोरियल्सच्या शाखा अचानक बंद; हजारो विद्यार्थी आणि पालक चिंतेत

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतरच अनेक शाखांचे कामकाज बंद झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
Mahesh Tutorials Shut down:मोठी बातमी! महेश ट्युटोरियल्सच्या शाखा अचानक बंद; हजारो विद्यार्थी आणि पालक चिंतेत

राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गेली अनेक दशके दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महेश ट्युटोरियल्सच्या महाराष्ट्रातील 33 शाखांचे कामकाज अचानक बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक चिंतेत सापडले आहेत. 1988 मध्ये महेश शेट्टी यांनी सुरू केलेल्या महेश ट्युटोरियल्सने राज्यभरात शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या जवळपास चार दशकांत या संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. मात्र, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतरच अनेक शाखांचे कामकाज बंद झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अनेक विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षाची फी आधीच भरली होती. शाखा बंद होण्यापूर्वी पालकांना कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच पालकांच्या आर्थिक हिताचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नाही, तर संस्थेत कार्यरत असलेल्या अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही झाला आहे. काही शिक्षकांनी वेतन थकित असल्याचा दावा केला असून, अचानक काम बंद झाल्याने त्यांच्या रोजगाराबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काही पालकांच्या म्हणण्यानुसार, महेश ट्युटोरियल्समधील विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून अरिहंत अकादमीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे का आणि त्याबाबतची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर पालकांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. फी परतावा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विविध पालक संघटनांकडून करण्यात येत आहे.

महेश ट्युटोरियल्सच्या शाखा नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आल्या, याबाबत संस्थेकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या निर्णयामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात असून, विद्यार्थी आणि पालक अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version