राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या अंतर्गत हालचालींना आता नवे वळण मिळाले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदालाच पक्षातील एका पदाधिकाऱ्याने थेट निवडणूक आयोगासमोर आव्हान दिले आहे. तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या संविधानानुसार झाली नसल्याचा दावा करत जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
तटकरेंच्या नियुक्तीवर नेमका आक्षेप काय?
पक्षाच्या अंतर्गत नियम आणि संघटनात्मक लोकशाही प्रक्रियेचे पालन न करता सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तटकरेंचा नियमित तीन वर्षांचा कार्यकाळ जुलै 2026 मध्ये पूर्ण झाल्याचे भाऊसाहेब गोरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यानंतर नव्याने संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत कसे आहेत?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
जालना दौऱ्यातील घटनेचाही तक्रारीत उल्लेख
सुनील तटकरे यांच्या जालना दौऱ्यादरम्यान काही पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. या घोषणांनंतर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांवर पदावरून हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. त्यामुळे या तक्रारीमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आधीपासूनच चर्चेत
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. अजित पवार यांच्या हयातीत पक्ष संघटनेबाबत काही निर्णय झाले होते आणि त्यांची अंमलबजावणी होणार होती, असा दावा त्यांनी केला. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर परिस्थितीत बदल झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असल्याचे मतही रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले होते. तसेच अजित पवार यांचीही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची इच्छा होती, असा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीनंतर राष्ट्रवादीतील समीकरणांना नवे वळण?
एकीकडे पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली तक्रार यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा ऐरणीवर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेतो का आणि तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.