‘गद्दार कोण हे महाराष्ट्राला ठाऊक’

‘गद्दार कोण हे महाराष्ट्राला ठाऊक’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. दरम्यान, ‘गद्दार कोण हे महाराष्ट्राला ठाऊक’ असे म्हणत कृपाल तुमाने यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दार असा उल्लेख केल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि खासदार चांगलेच भडकले आहेत. ‘गद्दार कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पहाटेच्या शपथविधीच्या वेळी बघितले, असे टीकास्त्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सोडले आहे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांचे शिबिर पार पडले. त्यावेळी अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतदान करताना ‘पन्नास खोके, एकदम ओके‘ विसरू नका असे सांगताना गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन केले होते.

याच पार्शवभूमीवर बोलत असताना तुमाने यांनी थेट अजित पवार यांच्यावर वार केला. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी आम्हाला खोक्याची भाषा सांगू नये. ते जलसंपदा मंत्री असताना किती गैरव्यवहार झाले आणि कोणी ट्रक भरून नेले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या सिंचन गैरव्यवहारामुळे डझनभर अधिकाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गद्दार असू तर हा शब्द त्यांनाच आधी लागू होतो.’’ महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना पहाटे शपथविधी उरकून घेणाऱ्याला काय म्हणायचे, असेही तुमाने म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version