पुणे: चैत्राची पालवी फुटण्यापूर्वीच सूर्यनारायणाने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याने 'भीषण' वळण घेतले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांनी यंदाच्या हंगामात प्रथमच चाळिशी ओलांडली असून, अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने संपूर्ण राज्याला वेढले आहे.
विशेष म्हणजे, रविवारी अमरावती येथे देशातील सर्वाधिक 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे राज्याचा हा भाग सध्या जणू 'हॉट चेंबर' बनला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करत दक्षतेचा इशारा दिला आहे.
वातावरणातील या बदलाला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरत आहे. उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि ओडिशापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत विस्तारलेला कमी दाबाचा पट्टा, यामुळे तापमानाचा पारा अनपेक्षितपणे वर चढला आहे. एकीकडे राजस्थानच्या फतेहपूरमध्ये 10.9 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद होत असताना, महाराष्ट्रातील विदर्भात मात्र सूर्याचे चटके असह्य होत आहेत. कमाल तापमान सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने वाढल्याने हवामान खात्याने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटेची घोषणा केली आहे.
राज्यातील तापमानाचा नकाशा पाहिला तर जळगावमध्ये 38.7 अंश सेल्सिअस, परभणीत 38.5 अंश सेल्सिअस आणि जेऊरमध्ये 38.0 अंश सेल्सिअस अशी तापलेली स्थिती आहे. पुण्यामध्येही उन्हाचा चटका वाढला असून येथे 36.8 अंश सेल्सिअस कमाल आणि 15.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
अहमदनगर 36.0 अंश सेल्सिअस, धुळे 36.5 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 36.1 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 37.6 अंश सेल्सिअस आणि धाराशिवमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. विशेष म्हणजे, कोकण किनारपट्टीवरील डहाणू (32.0 अंश सेल्सिअस) आणि रत्नागिरी (33.7 अंश सेल्सिअस) येथेही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
विदर्भात तापमानाचा पारा सर्वाधिक असून अकोल्यात 40.7 अंश सेल्सिअस, वर्ध्यात 40.2 अंश सेल्सिअस आणि ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ यांसारख्या ठिकाणी पारा 39 अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. परभणी कृषी केंद्रात 36.6 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे सूर्याची आग ओकणारी किरणे असताना नाशिकच्या निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी 11.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. हा तापमानातील विरोधाभास आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरत असून, राज्यात घामाच्या धारा वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विभागीय सरासरीनुसार, विदर्भाचा पारा 16.3 अंश सेल्सिअस (किमान) ते 40.8 अंश सेल्सिअस (कमाल) दरम्यान असून, उत्तर महाराष्ट्रात 11.5 अंश सेल्सिअस ते 38.7 अंश सेल्सिअस, पश्चिम महाराष्ट्रात 12.6 अंश सेल्सिअस ते 39.5 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात 13.4 अंश सेल्सिअस ते 38.5 अंश सेल्सिअस आणि कोकणात 18.9 अंश सेल्सिअस ते 34.6 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा उन्हाचा चटका आणि उकाडा आगामी काही दिवस असाच कायम राहणार आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्ध्यातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मार्चच्या सुरुवातीलाच जाणवणारी ही दाहकता पाहता, मे महिन्यातील उन्हाची तीव्रता किती भीषण असेल, याची कल्पनाही करवत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.