Maharashtra Government Film Awards: प्रसाद ओकला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी यांनाही सन्मान

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.
Maharashtra Government Film Awards: प्रसाद ओकला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी यांनाही सन्मान

चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने यंदाच्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि पटकथा लेखनाच्या माध्यमातून वेगळी छाप पाडणाऱ्या चार दिग्गजांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 2025 सालासाठीचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, त्यासंदर्भातील शासन परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात.

यंदा ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक यांची चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांनी मराठी भावसंगीत आणि चित्रपटसंगीत क्षेत्रात अजरामर ठसा उमटवला आहे. 'त्या फुलांच्या गंधकोषी', 'सागरा प्राण तळमळला' यांसारख्या गीतांमधून त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

प्रसाद ओक यांनी अभिनेता म्हणून अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २' या चित्रपटांचे दिग्दर्शन करत दिग्दर्शक म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्या सहकार्याने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक संस्मरणीय चित्रपटांच्या पटकथा दिल्या आहेत. त्यांच्या लेखनामुळे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आणि बॉलिवूडच्या पटकथा लेखनाला नवे परिमाण मिळाले. राणी मुखर्जी यांनी 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'हम तुम', 'मर्दानी' यांसारख्या चित्रपटांतील प्रभावी भूमिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षक आणि समीक्षकांचीही दाद मिळवली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version