Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेला वेग; ‘या’ महिन्यापासून खात्यात जमा होणार रक्कम, लाखो शेतकऱ्यांना फायदा

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा होण्याची शक्यता असून प्रक्रिया वेगाने सुरू आहे
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेला वेग; ‘या’ महिन्यापासून खात्यात जमा होणार रक्कम, लाखो शेतकऱ्यांना फायदा

Farmer Loan Waiver: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या योजनेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे.

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून सरकारकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा: LPG Cylinder New Rule: घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! PNG कनेक्शन असल्यास 30 दिवसांत LPG सिलेंडर करावे लागणार सरेंडर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी स्वतंत्र डिजिटल प्रणाली तयार करण्यात आली असून बँकांकडून लाभार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे. राज्यातील विविध बँका त्यांच्या कर्जधारकांची माहिती थेट सरकारी पोर्टलवर अपलोड करणार आहेत.

या योजनेतील महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता भासणार नाही. बँकांकडून उपलब्ध असलेला कर्जाचा तपशील प्रणालीमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाच्या टप्प्यावर संबंधित शेतकरी आपली माहिती तपासून ती योग्य असल्याची खात्री देतील. त्यामुळे कागदपत्रांची धावपळ आणि शासकीय कार्यालयांचे फेरे टाळले जाणार आहेत.

योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे. तर ज्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांसाठीही सरकारने स्वतंत्र तरतूद केली आहे. ठरावीक कालावधीत उर्वरित थकबाकी भरल्यानंतर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: LPG Price Hike: गॅस सिलेंडर पुन्हा महागला; पेट्रोल-डिझेलनंतर सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे LPG दर

याशिवाय, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनासह विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील शेती क्षेत्र अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना ही योजना मोठा आधार ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जुलैपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version