Cold Wave Alert: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रावर ओढवणार थंडीचं संकट; पुढील पाच दिवस हवामानात मोठे बदल

उत्तर भारतातील दाट धुक्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवत असून, पुढील पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने थंडी आणि गारठ्याचा सतर्कतेचा इशारा दि
Cold Wave Alert: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रावर ओढवणार थंडीचं संकट; पुढील पाच दिवस हवामानात मोठे बदल

Cold Wave Alert:डिसेंबरचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी थंडी, धुके आणि बोचऱ्या वाऱ्यांची नवी परीक्षा घेणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. उत्तर भारतात सध्या दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत राज्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि कोरडे हवामान यामुळे सकाळी आणि रात्री गारठा अधिक तीव्र होईल.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण e-KYCची मुदत पुन्हा वाढली, पण सोशल मीडियावर भलत्याच चर्चा

विदर्भातही थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट सक्रिय असल्याने त्याचा थेट परिणाम विदर्भातील जिल्ह्यांवर होत आहे. नागपूरसह काही भागांत किमान तापमान १० अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी थंडीचा त्रास अधिक जाणवणार असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निवळल्यानंतर तापमानात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र आहे. परभणी, निफाड, अहिल्यानगर आणि धुळे परिसरात आधीच थंडीची तीव्रता वाढली असून, पुढील दोन दिवसांत गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईतही मागील ४८ तासांत थंडीचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री आणि पहाटे हवेत गारवा वाढला असून, थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरत आहे. शहरांमध्ये धुक्याचे प्रमाण कमी असले, तरी थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.

हेही वाचा: Mumbai Metro Line 3 : मुंबईकरांसाठी गुडन्यूज!; थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' धावणार रात्रभर, MMRCL चा निर्णय

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरनंतर हिमालयीन भागात एक नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तर भारतासह मध्य आणि पश्चिम भारतातील हवामानावर होणार असून, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान थंडीची लाट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ५ ते ८ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पहाटे आणि रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, उबदार कपडे वापरावेत आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासोबतच महाराष्ट्राला थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version