मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींची सध्याची अवस्था सुधारण्यासाठी ग्रामविकास मंत्री जायकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व समाजघटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पाणीपुरवठा, वीज, वृक्षलागवड आणि छताची व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच बांधकाम आरसीसी पद्धतीने करण्याचे निर्देश देत, नागरिकांसाठी बसण्याची सोय आणि पोहोच रस्त्याची उभारणी करण्यासही सांगितले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, स्मशानभूमींमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची सुविधा निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी दिली आहे.
यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समितीचीही नियुक्ती करण्यात आली असून, ती स्मशानभूमींची स्थिती, गरजा आणि आवश्यक सुधारणा याबाबत सविस्तर अहवाल तयार करणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.
दरम्यान, या स्मशानभूमी सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याचा प्रयत्न असल्याचे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. समाजात समतेचा संदेश देत एकात्मतेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.