Mumbai Local: झुरळांच्या समस्येवर रेल्वे प्रशासनाची धावपळ; मुंबई लोकलमध्ये राबवण्यात येणार विशेष स्वच्छता मोहीम

अनेक लोकल डब्यांमध्ये आसनाखाली, कोपऱ्यांत आणि फटींमध्ये झुरळांचा मुक्त वावर दिसून येत आहे.
Mumbai Local: झुरळांच्या समस्येवर रेल्वे प्रशासनाची धावपळ; मुंबई लोकलमध्ये राबवण्यात येणार विशेष स्वच्छता मोहीम

मुंबई लोकल ट्रेनमधील झुरळांच्या वाढत्या त्रासाची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून वाढत्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने लोकलमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव कोणत्या मार्गांवर, कोणत्या गाड्यांमध्ये आणि कोणत्या डब्यांमध्ये अधिक आहे याची सविस्तर माहिती गोळा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोकल डब्यांमध्ये आसनाखाली, कोपऱ्यांत आणि फटींमध्ये झुरळांचा मुक्त वावर दिसून येत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत हे प्रकार अधिक जाणवत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. काही प्रवासी झुरळांना मारण्यासाठी चप्पल किंवा पायांचा वापर करतात, ज्यामुळे डब्यांमध्ये आणखी अस्वच्छता निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

हेही वाचा – Pandharichi Wari:मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिंड्यांना सरकारकडून 2.80 कोटींचा निधी मंजूर

रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, लोकलमध्ये अन्नपदार्थांचे अवशेष, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता यामुळे झुरळांचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रवासी प्रवासादरम्यान अन्नपदार्थांचे पॅकेट्स, कचरा योग्य प्रकारे न टाकल्याने ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने झुरळमुक्तीसाठी विशेष मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये डब्यांची नियमित आणि अधिक प्रभावी स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच कीटकनाशक फवारणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारींच्या आधारे सर्वाधिक प्रभावित मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई केली जाणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वच्छतेबाबत अधिक कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे मान्य केले असून, मुंबई लोकलमधील प्रवास अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी पुढील काही दिवसांत विशेष अभियान सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version