पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा 89.79 टक्के लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 2.09 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी हा निकाल 91.88 टक्के होता. यंदा परीक्षेत कॉपीमुक्त मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे निकालात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. आज, 2 मे रोजी राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत घेत निकाल जाहीर केला. यावेळी सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, 94 टक्के लागला असून लातूरचा निकाल सर्वात कमी, 84 टक्के लागला आहे. तसेच यंदाही मुलींनीच बाजी मारली असून 93.15 टक्के मुली तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. यावेळी बोर्डाने निकालाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी मार्कशीटमध्ये काही बदलही केल्याचे नमूद केले. तसेच कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगत बोर्डातर्फे काही बदल होण्याचे संकेतही देण्यात आले. बारावीची परीक्षा कागदावर घेण्यासंदर्भात बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.