जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास धमकावल्याच्या आरोपातून पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची देसाईगंज न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
2016 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर निवडणूक चिन्हासाठी दबाव टाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर 2016 च्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजून जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यामुळे या नगर परिषदेच्या एका वॉर्डातील निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली होती.
देसाईगंज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केल्यावर तेथील न्यायालयात खटला सुरू होता. मंगळवारी या प्रकरणात देसाईगंज न्यायालयाचे न्या. सिंघल यांनी सबळ पुराव्याअभावी जानकर यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे मंत्री महादेव जानकर यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जानकर यांना न्यायालयाने निर्दोष सोडल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.