मराठी जनांकडून ध्वजवंदनाचा घोळ का होतो ?

मराठी जनांकडून ध्वजवंदनाचा घोळ का होतो ?

ध्वजारोहण आणि ध्वजावतरण शब्दांमध्ये मराठी जनांचा घोळ नेहमीचा आहे. अनेक जण गूगलवर या शब्दांचा अर्थ शोधतात आणि गूगल ‘अवतरण’ या शब्दाचा हिंदी अर्थ आधी सादर करते. हिंदीत ‘अवतरण’ म्हणजे ‘उतारना’ असा अर्थ आहे. मात्र, मराठीत ‘अवतरण’ म्हणजे ‘ऊर्ध्व जागी अस्तित्व दाखवणे’ असाही त्याचा सापेक्ष अर्थ आहे. त्यानुसार, स्तंभाच्या ऊर्ध्व दिशेला ध्वज अवतीर्ण झाला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला ध्वजावतरण करण्यात आले.

२६ जानेवारी २०२३ रोजी काय घडले ?

यंदाही राज्यभरात ध्वजवंदनाच्या पद्धतीत घोळ झाला आहे. अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिनी ध्वजावतरणाच्या ऐवजी ध्वजारोहण करण्यात आले आहे.
कोल्हापूर, भंडारा, धुळे, सातारा आणि जालना येथे पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वज खालून वर नेत ध्वजारोहण केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील शासकीय निवासस्थानी तसेच मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पोलीस मुख्यालयात स्तंभाच्या सर्वोच्च जागी शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेला राष्ट्रध्वज गाठ सोडून फडकावला. या पद्धतीला ध्वजावतरण म्हणतात.

ध्वजारोहण आणि ध्वजावतरणात नेमका फरक काय ?

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाची पद्धत वेगवेगळी आहे. स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट रोजी) ध्वज खालून वर नेत फडकावला जातो.
प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी रोजी) शिस्तबद्धरित्या घडी घातलेला ध्वज गाठ सोडून फडकवतात. दोन्ही राष्ट्रीय सणांना ध्वज फडकवला जात असला तरी त्यासाठी स्वतंत्र संबोधने आहेत.
१५ ऑगस्टला राष्ट्रध्वज खालून वर नेला जात असल्याने ध्वजारोहण शब्द वापरतात. ध्वजारोहण म्हणजे स्तंभावर राष्ट्रध्वज आरूढ झाला.
२६ जानेवारीला स्तंभावर आधीच चढवलेला राष्ट्रध्वज घडी उघडून फडकावला जातो. प्रजासत्ताक दिनाला स्तंभाच्या सर्वोच्च स्थानी ध्वज अवतीर्ण होतो म्हणून त्याला ध्वजावतरण म्हणतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version